Friday, January 18, 2013

Manatle Kahi-मनातले काही


facebook.comमनातले काही

नमस्कार मित्रमैत्रिणींनो ,

खूप दिवस झाले, भेटले नव्हते , मनात खूप काही होते पण वेळच मिळत नव्हता पण आज म्हटले की आता जर बोलले नाही तर नंतर मनाला रुखरुख लागून राहील .

सध्या जे काही देशात चालले आहे ते पाहून मन विचलित होते,वाटते काही चुकलेय का आपल्या पालकांचे आपल्याला संस्कार देताना? किंबहुना पारतंत्र्यात वाढलेल्या ,हालअपेष्टा  काढलेल्या पिढीने आपल्याला मुक्तद्वार दिले आपल्या मनासारखे करण्याचे, त्याचा गैरवापर करतोय आपण. आज ज्या पद्धतीने सगळे काही चालले आहे ते बघता आपल्या घरादाराचा  ,संसारसुखाचा  त्याग करून आपल्या  जीवनाची अक्षरशः  होळी करून स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान देणारे मूर्ख होते असेच म्हणावे लागेल. आपले शिक्षण,मोठ्या पगाराची नोकरी,सुखसोयी ह्यांचा विचार न करता देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्यांचा  आपण अपमान करतो आहोत असे वाटत नाही का? 

स्वातंत्र्य मिळून उणीपुरी ६५वर्षेच झाली आणि त्यागाचे,सत्याचे,नीतीमत्तेचे बंधुभावाचे प्रतिक असलेला हा देश आज जगातला सर्वात भ्रष्ट,असुरक्षित,बिनभरवशाचा (  जागतिक पाहणीनुसार)   झालाय  ह्याची   आपल्याला  काही  खंत वाटणार  आहे  का?  की " सब  चलता है ,हम अपना देखे " ही वृत्तीच धारण करून सगळे वागणार आहोत ?

ब्रिटीशांच्या दडपशाहीला न घाबरणारे कोणी वशिल्याचे तट्टू नव्हते तर तुम्हा आम्हांसारखेच  सामान्य  लोकं होते, त्यांनाही तेच प्रश्न सतावित असणार जे आपल्याला आता सतावतात पण ते मागे नाही हटले, घाबरले नाहीत, की  तुरुंगात जावे लागेल किंवा  हालअपेष्टांचे  जीवन जगावे लागेल.  जर त्यांनी तसा विचार केला असता (आणि का करू नये?) तर तुम्ही आम्ही असे मोकळे जीवन जगू शकलो असतो का? मग हा धीरोदात्तपणा  आपण पुढच्या पिढीसाठी का दाखवू शकत नाही? आपण स्वत: भ्याड झालोत आणि पुढ्च्या   पिढीला ही  तीच शिकवण देत आहोत की  स्वत:पुरते बघ, मग  पुन्हा पारतंत्र्यात जायला कितीसा वेळ लागेल? कारण आठवून बघा, आपल्याला पारतंत्र्य का मिळाले? जेव्हा ब्रिटिशांनी  भारतावर कब्जा केला होता तेव्हा आपण प्रांता- प्रांतात, जाती- प्रजातीत वाटले गेलो होतो, शिवाजी महाराजांची शिकवण विसरलो होतो,झाशीची राणी एकटी पडली होती कारण बहुतांशी राज्यकर्ते दुसऱ्या  बाजीरावांसारखे  सुखलोलुप आणि भ्याड होते,नाकर्त्या लोकांमुळे आलेल्या  पारतंत्र्याला  घालवायला  १५० वर्षे आणि हजारो, लाखो कर्तबगार माणसांची आहुती द्यावी लागली. आज आपण पुन्हा त्याच वळणावर उभे आहोत असे वाटतेय, इस्ट इंडिया कंपनी ऐवजी कुठलीतरी दुसरी कंपनी येईल,' ब्रिटीश राज नसेल' तर 'अमेरिका राज' असेल, काय फरक पडतोय? गरीब आणखी गरीब होईल आपल्याला काय त्याचे ? आपण आपल्यापुरत बघावे एखादी नोकरी करावी,लोन काढून घर घ्यावे,लोकल ट्रेन असणारच (ब्रिटिशांनी चालू केलीय ती) मग राज्य कोणाचे का असेना? नाही का? 

पण आपल्या लक्षात एक गोष्ट कदाचित येत नसेल,अगदी मुंबईचेच उदाहरण बघा, १०-१२ वर्षांपूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई ह्यात काही फरक जाणवतोय? नसेल तर विचार करा १०-१२ वर्षांपूर्वी इथे मध्यमवर्ग होता अगदी दक्षिण मुंबईपासून ते  उपनगरापर्यंत  अगदी सारख्या प्रमाणात विभागला गेला होता आणि आता? मध्यमवर्ग चाललाय मुंबईच्या बाहेर आणि काही काळाने मुंबईत राहतील फक्त श्रीमंत ज्यांची कोट्यावधिची  मालमत्ता असेल त्यांच्या सुखसोयीची ठिकाणे,त्यांची  प्रशस्त कार्यालये, आणि तिथे काम करणार्यांसाठी "ऑफिस क्वार्टर्स" किंवा अतिशय गरीब जे झोपडपट्टीत राहतील आणि घरकाम किंवा सफाई कामगाराचे  काम करू शकतील.आत्ताच सुरुवात झालीय, मध्यमवर्ग पार पनवेलच्या,दहाणूच्या  पुढे जातोय,झोपडपट्टी वाढतेय,अगदी रस्त्यावर,पुलाखाली सुद्धा लोकं संसार थाटून बसलेत,घरांचे भाव गगनाला भिडलेत  जे फक्त आणि फक्त श्रीमंतच घेवू शकतात. काही वर्षांनी मुंबई ही 'पाम आयलंड' सारखी 'बनाना मुंबई'  होऊन जाईल फक्त तिथे दुबईचा शेख आहे तर इथे मुंबई कोणाची ह्यावर राजकारण होवु शकते आणि सर्व मिळून मुंबई कोणालातरी आंदण दिली जावू शकते, मुंबईच्या इतिहास हेच सांगतो की मुंबई नेहमी आंदणच दिली गेलीय .....